राहुल गांधींना धक्काबुक्की : मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन

उत्तर प्रदेशातील हथरस बलात्कार प्रकरण
राहुल गांधींना धक्काबुक्की : मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन

मुंबई -

उत्तर प्रदेशातील हथरस येथील बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या

राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन केले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी केलेल्या दंडेलशाहीचा महाराष्ट्रात काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाही विरोधात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दीकी माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले, उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. हथरसयेथील अमानवीय घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे त्यामुळेच राहुल गांधी गांधी आणि प्रियंका गांधी यांना हथरसयेथे जाऊ दिले जात नाही. काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. भाजपा सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. पीडित कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकार विरोधात संघर्ष करत राहील असं त्यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावतीत युवक काँग्रेसच्यावतीने गर्ल्स हॉस्टेल चौकात निदर्शने करून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. तर भंडारा येथे राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला, त्यामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत होती, यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com