भाजपला रेमडेसिवीर मिळतात कसे – मुश्रीफ

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी ओढाताण सुरू आहे. लोक रांगेत लावून इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपच्या लोकांना हे इंजेक्शन सहजासहजी मिळतातच कशी? केंद्र सरकार त्यांच्यावर एवढे मेहरबान कसे? असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला टोला लगावला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप एका पोलीस अधिकार्‍याने केला आहे. परमबीर यांच्या सांगण्यावरून शंभर कोटींच्या तक्रारीचा तपास होऊ शकतो. मग, त्यांच्यावरील हजारो कोटींचा तपास का होऊ शकत नाही. तो तातडीने करावा, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.

करोना आढावा बैठकीसाठी नगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री मुश्रीफ आले असता पत्रकारांशी बोलत होते. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटीचा आरोप केला. त्याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्यात आली. मग आता परमबीर सिंग यांच्यावरील हे आरोप हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आहेत. शिवाय त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्याही तक्रारी येत आहेत. परमबीर यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली. दुसरीकडे सचिन वाझेंवरही कारवाई झाली. मग आता परमबीर यांच्यावर जे आरोप झाले आहेत, त्याची तातडीने चौकशी करण्याची गरज आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

शिर्डीत 300 बेड क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प

साईबाबा संस्थान तसेच अंबानी समूहाच्या सहकार्याने शिर्डीमध्ये मोठ्या ऑक्सिजन प्रकल्पाची परवानगी मिळाली आहे. 300 बेडला पुरेल एवढा ऑक्सिजन हवेतून निर्माण करणारा हा प्रकल्प असून लवकरच तो कार्यरत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असे ते म्हणाले.

चढ्या भावानेही औषधे खरेदी करण्याची तयारी

सध्या औषध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफेखोरी सुरू केली आहे. कृत्रिम टंचाई करून लोकांची लूट सुरू आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करील, परंतु सध्या लोकांची गरज लक्षात घेता आहे त्या भावात औषधे खरेदी करून लोकांचा जीव वाचवण्यावर शासनाचा भर आहे. त्यादृष्टीने औषधे खरेदीला प्राधान्य दिले जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.

त्या बाधितांना बाहेर काढा

जिल्ह्यात अनेक करोना रुग्ण अजून घरातच आहेत. घरात राहून ते अख्ख्या कुटुंबाला बाधित करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या लोकांना घरातून बाहेर काढून शासकीय विलगीकरण कक्षात ठेवावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच सध्या खासगी रुग्णालये अवाजवी बिले घेत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सक्त ताकीद द्यावी, तसेच त्यांच्या बिलांचे ऑडिट करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *