हरेगावच्या लोकनियुक्त सरपंचांसह 31 सदस्य अपात्र
राजकीय

हरेगावच्या लोकनियुक्त सरपंचांसह 31 सदस्य अपात्र

एकलहरेच्याही एका सदस्यावर जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने कारवाई

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील 31 जणांचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यावर वर्षभरात जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी रद्द केले आहे. त्यामध्ये हरिगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अस्मिता दीपक नवगिरे व ग्रा.प.सदस्य सागर सोनवणे, उषा कांबळे तसेच एकलहरे येथील ग्रामपंचायत सदस्या कोकिळा अग्रवाल यांचा समावेश आहे.

हरेगाव ग्रामपंचायतीत माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सभापती दीपक पटारे, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांच्या गटाला 11 जागा मिळाल्या होत्या. तर ससाणे गटाला दोन जागा मिळाल्या होत्या. पैकी सत्ताधारी गटाचे तीन सदस्य अपात्र ठरले. आता इतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकासोबत या पोटनिवडणुका होतात की यासाठी 3 महिने मुदतीत पोटनिवडणुका होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान टिळकनगर वार्ताहराने दिलेल्यव वृत्तात म्हटले आहे की, निवडून आल्यानंतर वर्षभरातही जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीच्या सदस्या कोकिळा अग्रवाल यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मागासवर्गीय प्रवर्गातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला उमेदवारी अर्जाबरोबर जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास निवडून आल्यानंतर वर्षभरात जातवैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे शपथपत्र उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करावे लागते. परंतु कोकिळा अग्रवाल यांच्यासह अनेकांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे तक्रारी श्रीरामपूर तहसील कार्यालयात सादर झाल्या.

त्यामुळे संबधीत तहसीलदार यांनी तपासणी केली असता तालुक्यातील 31 ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे समोर आले. त्यामुळे श्रीरामपूर तहसीलदारांनी 31 जणांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

दरम्यान मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीपैकी एकलहरे ग्रामपंचायतीचा त्यात समावेश असून, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुदतवाढ मिळावी म्हणून रिट याचिका दाखल केली आहे. तथापि न्यायालयात निर्णय अद्याप प्रलंबित असून प्रशासक किंवा मुदतवाढ अशी चर्चा रंगत आहे.

एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ असून, कोकिळा अग्रवाल सदस्यत्व रद्द झाल्याने सदस्य संख्या आठ झाली त्यात सत्ताधारी मुरकुटे गटाकडे 5 तर विरोधी गटाकडे अवघे तीनच सदस्य उरले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अग्रवाल यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने गावांत एकच चर्चा रंगू लागली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com