Thursday, April 25, 2024
Homeराजकीयपर्यावरणवादी कार्यकर्ती 'दिशा रवी'च्या अटकेवरून राजकारण तापलं

पर्यावरणवादी कार्यकर्ती ‘दिशा रवी’च्या अटकेवरून राजकारण तापलं

दिल्ली l Delhi

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला बेंगळुरू येथून अटक केली आहे. फ्राइडे फॉर फ्यूचर कँम्पेनच्या संस्थापक असलेल्या दिशा रवि यांना शनिवारी अटक करण्यात आली. दिशा रवी हिला अटक करण्यात आल्यानंतर राजकारण तापलं आहे. राहुल, प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. ‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरत आहेत’ अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. ‘डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से’ अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. तसेच दिशा रवीच्या अटकेवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ReleaseDishaRavi, DishaRavi IndiaBeingSilenced हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

तसेच काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत गळचेपी केला जात असल्याचं आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी काही घटनांच्या बातम्या ट्विट केल्या आहे. यात ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे. या तीन बातम्या ट्विट करत राहुल गांधी यांनी फैज अहमद फैज यांच्या कवितेतील ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!’ ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर ‘ते घाबरले आहेत, पण देश घाबरलेला नाही. भारत गप्प बसणार नाही’ असा इशारा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देखील दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. देविंदर सिंह यांच्या फोटोसह दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. “कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर… आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?. खालच्या दोन शीर्षकांमध्ये उत्तर मिळेल” असं शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता ते जामिनावर बाहेर आहेत.

तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील दिशा रवीच्या अटकेचा विरोध केला आहे. भारत मूर्खपणाचं नाट्यगृह बनत चाललाय, अशा शब्दात चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेवरुन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पी. चिदंबरम यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, ‘जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे.’ तसेच ‘भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि दिल्ली पोलिस अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत, ही खेदाची बाब आहे. मी दिशा रवीच्या अटकेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो’ असं म्हणत चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेचा तीव्र विरोध केला आणि त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

कोण आहे दिशा रवी ?

दिशा रवी ही पर्यावरणवादी आहे. जलवायू संदर्भात जनजागृती करण्याचं काम ती करते. ती बेंगळुरूची रहिवासी आहे. दिशा बेंगळुरूच्या प्रतिष्ठीत माऊंट कार्मेलची विद्यार्थीनी आहे. तिने माऊंट कार्मेल महाविद्यालयातून बीबीएची पदवी घेतली आहे. दिशाचे वडील रवी हे मैसूरमध्ये अॅथेलिटिक्स कोच आहेत. तर आई गृहिणी आहे. तसेच फ्राइडेज फॉर फ्यूचर इंडिया नावाच्या संस्थेची ती संस्थापक आहे. सध्या ती गुड वेगन मिल्क नावाच्या संस्थेत काम करते. प्लान्ट बेस्ड फूड अधिक स्वस्त आणि सुलभ बनविण्याचं काम ही संस्था करते. गाय, म्हशींसह प्राण्यांवर आधारीत कृषी पद्धत संपुष्टात आणून प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार द्यावा, अशा मताची दिशा रवी आहे. तसेच वातावरणातील बदलाच्या मुद्द्यावर तिचं काम सुरू आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच ती या विषयावर काम करत आहे. मुंबईच्या आरे कॉलनीतील वृक्ष तोडण्याचं प्रकरण असो की केंद्र सरकारने आणलेल्या EIA 2020 कायदा असो, प्रत्येकवेळी तिने विरोध केला आहे. तिच्या फ्रायडे फॉर फ्यूचर संस्थेत साधारणपणे १०० ते १५० सदस्य सक्रिय आहेत. हे सर्व जण बेंगळूरूमध्ये काम करतात. दिशा रवी सातत्याने पर्यावरणावर वृत्तपत्रातून स्तंभलेखन करते, लेखही लिहते.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून ग्रेटा थनबर्गने एक ट्वीट केलं होतं. त्यासोबत एक टूलकिट शेअर केलं होतं. त्या टूलकिटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलन कशा प्रकारे करण्यात यावं याची माहिती देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विस्तार कशा पद्धतीने करायचा, काय पाऊले उचलायची याची सखोल माहिती या टूलकिटमध्ये देण्यात आली होती. शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट करताना कोणता हॅशटॅग वापरायचा, काय ट्वीट करायचं तसंच सरकारच्या कारवाईपासून कसा बचाव करायचा याची सखोल माहितीही देण्यात आली होती. नंतर यावरुन वाद झाल्याने ग्रेटा थनबर्गने ते टूलकिट डिलीट केलं. हे टूलकिट खालिस्तानवादी समर्थकांकडून तयार करण्यात आलं आहे असा संशय व्यक्त करुन दिल्ली पोलिसांनी त्या संबंधी गुन्हा नोंद केला होता. आता शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी दिशेने याचा तपास करण्यात येतोय.

टूलकिट म्हणजे काय ?

टूलकिट म्हणजे एक दस्ताऐवज असते. एखाद्या मुद्याची माहिती देणारे आणि त्यावर कृती करण्याबाबतची सविस्तर माहिती असते. एखादे मोठे आंदोलन अथवा मोहिमेत सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवकांना याबाबतचे निर्देश दिले जातात. स्वयंसेवकांना, मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या या टूलकिटची मोठी मदत होते. ऑनलाइन अथवा ऑफलाइन सुरू असणाऱ्या कोणत्याही अभियानात एकाच वेळी, एकत्रितपणे एकाच दिशेने काम करण्यास याची मदत होते. भारतातही काही फॅक्ट चेक वेबसाइटसकडून काही राजकीय पक्षांकडून एकच आशय असणारा आणि एकाच वेळी सोशल मीडियावर प्रसारीत केले जाणारे मेसेज समोर आणण्यात आले. टूलकिटमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रेंड तयार करण्यास मोठी मदत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या