राळेगणसिध्दीत दोघांना साड्या वाटताना पकडले

jalgaon-digital
4 Min Read

– संवेदनशील 63 गावांवर पोलिसांचे विशेष लक्ष

– तहसीलदारांचे कारवाईचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संकटानंतर पहिल्यांदाच नगर जिल्ह्यामधील 705 ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवार दि. 15 जानेवारी रोजी निवडणुका होत आहेत. दरम्यान राळेगणसिध्दीत दोघांना साड्या वाटताना पकडले.

5788 जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या 13194 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होत आहे. यानिमित्ताने सुमारे साडेतेरा लाख मतदारराजांनी कोणत्या उमेदवारांना नाकारले नी कुणाला विजयाचे तिळगूळ दिले याचे उत्तर सोमवार दि.18 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान एकूण 767 पैकी 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने यावरील होणारा प्रशासकीय खर्च वाचला आहे.

गत आठवडाभरापासून उमेदवार आणि त्यांच्या पॅनल प्रमुखांनी जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी पॅनेल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंग भरला. ग्रामपंचायतीचा मतदारसंघ अत्यंत छोटा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. तर काहींनी शक्तीप्रदर्शन करून गावात आपलाच वट असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. काही उमदेवारांनी तर शेतात राहणार्‍या मतदारांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेऊन आपल्यालाच मतदान करण्याचा आग्रह केला.

काल शेवटच्या दिवशी तर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. अनेकांनी भावकीतल्या लोकांची भेट घेऊन मतदान करण्याचीही विनंती केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गावातील गट, मंडळ आणि तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘सेटिंग्ज’ केली आहे. त्यात या उमेदवारांना कितपत यश आलंय हे निकालाच्या दिवशीच समजून येणार आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक होणार्‍या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणार्‍या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेतरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.कारखाने, दुकाने, हॉटेलातील कामगारांसाठीही हे निर्देश आहेत.

या ग्रामपंचायतींसाठी आज होणार्‍या मतदानासाठी 2 हजार 553 मतदान केंद्र असून त्यात 50 मतदान केंद्र हे संवेदनशील घोषित करण्यात आलेले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात पारपाडण्यासाठी 519 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना सहायक म्हणून तेवढेच निवडणूक निर्णय अधिकारी देण्यात आलेले आहेत.

14 तालुक्यासाठी मतदान केंद्रावर 12 हजार 765 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक तालुक्याला तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी कार्यरत राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 8 उपजिल्हाधिकारी यांच्यावर निवडणूक निरिक्षक म्हणून 14 तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

निवडणूक असणार्‍या मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 कर्मचारी, एक शिपाई असे 5 जण नियुक्त आहेत. निवडणुकीसाठी 50 मतदान केंद्र संवेदनशील ठरवलेले आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 1 हजार 455 राजकीय फलक हटविण्यात आले आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात आता 1 हजार 200 मतदार ऐवजी 700 ते 800 मतदार संख्या ठेवली जाणार आहे. मतदान शुक्रवारी (दि. 15) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल.

मतमोजणी सोमवारी (दि. 18) रोजी तालुका ठिकाणी होईल. आज होणार्‍या मतदानादरम्यान 14 लाख 62 हजार 362 मतदार मतदानांचा हक्क बजावणार आहेत. यात 6 लाख 96 हजार 553 स्त्री मतदार असून 7 लाख 65 हजार 801 पुरूष मतदार आहेत. यासह अन्य 8 मतदार आहेत. सकाळी 7. 30 ते 9.30 या दरम्यान पहिल्या टप्प्यातील झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.

मतदानासाठी 3 हजार 509 बॅलेट युनिट असून तेवढेच कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत. मतदान यंत्र आणि साहित्य वाहून आणण्यासाठी 411 एसटी बससे आणि 298 जीप तैनात आहेत. यासह बोटावर शाई लावण्यासाठी 8 हजार 832 मार्क आणि तेवढेच पेपर सील देण्यात आलेले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *