ग्रामपंचायतीचे प्रशासक नामधारी आणि ग्रामसेवक झाले कारभारी !

ग्रामपंचायतीचे प्रशासक नामधारी आणि ग्रामसेवक झाले कारभारी !

लोणी |वार्ताहर| Loni

ऑगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती झाली खरी

पण प्रशासक फक्त नामधारी असून ग्रामसेवक हेच कारभारी झाले आहेत.

करोनाच्या महामारीत निवडणूक घेणे शक्य नसल्याने ऑगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर गट विकास अधिकार्‍यांनी आदेश काढून शासकीय अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

राहाता तालुक्यात ऑगस्ट महिन्यात दहा ग्रामपंचायतींची मुदत संपली. या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, बाभळेश्वर या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पंचायत समितीचे वेगवेगळ्या चार विभागाचे विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अनेक प्रशासकांकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आला. आदेशाप्रमाणे त्यांनी पदभार स्वीकारला पण त्यांच्याकडे पंचायत समितीतील महत्त्वाची जबाबदारी आणि कामाचा मोठा व्याप असल्याने ते प्रशासक म्हणून ग्रामपंचायतींसाठी वेळ देऊ शकत नाहीत. खरे तर पूर्वी सरपंच जी जबाबदारी सांभाळत होते ते प्रशासकाला पार पाडायची आहे.

अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य करोना महामारीत योध्द्याप्रमाणे कर्तव्य पार पाडीत होते. प्रशासक तेवढा वेळ देऊ शकणार नाहीत. म्हणजेच फक्त महत्त्वाची वेळीच ते काही वेळ देऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात आणखी काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने या प्रशासकाकडे अधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी येऊ शकते.

अशावेळी ते आठवड्यातून किती दिवस प्रत्येक ग्रामपंचायतीला वेळ देऊ शकतील हा मोठा प्रश्न आहे. परिणामी प्रशासक आणि ग्रामसेवक हे ऑनलाईन कारभार करणार यात शंका नाही. जनतेचे रोजचे प्रश्नही कसे सुटणार? अनेक दाखल्यांवर प्रशासकांची सही लागेल ती मिळण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षाच करावी लागेल. परिणामी ग्रामपंचायतींचा कामाचा वेग मंदावणार यात शंका नाही.

प्रशासक नियुक्तीनंतर संपूर्ण जबाबदारी आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर आली आहे. सरकारी यंत्रणाच कारभार पाहणार असल्याने गतिमान प्रशासनाचा अनुभव जनतेला घेता येईल. यापूर्वी नियमात न बसणारी कामे मार्ग काढून सरपंच व सदस्य सोडवीत होते आणि नागरिकांची अडचण दूर करीत होते.

आता तसे होणार नाही. प्रशासक जास्त वेळ उपलब्ध राहू शकत नसल्याने ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हेच नागरिकांना भेटणार असल्याने तेच कारभारी होणार आहेत. सदस्य मंडळ अनेक विकास कामांचे प्रस्ताव तयार करून पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करीत होते.

आता प्रशासक आणि ग्रामसेवक तेवढा पाठपुरावा करणार नाहीत आणि त्याचा थेट परिणाम काय तर विकासाची गती मंदावणार. पुढचे काही महिने हाच अनुभव या गावांना येणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. एक तर करोनाचा प्रभाव वाढत चाललाय आणि प्रशासकाना एकाचवेळी अनेक जबाबदार्‍या पार पडायच्या आहेत.

सध्या तरी लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, बाभळेश्वर, नांदूर, ममदापूर, हनुमंतगाव, गोगलगाव, पाथरे बुद्रुक या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर प्रशासक नामधारी आणि ग्रामसेवक कारभारी अशीच परिस्थिती दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com