मुंबई l Mumbai

ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील सूप्त संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. आता या संघर्षाने नवे टोक गाठल्याचे चिन्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल कोश्यारी हे उत्तराखंड येथील एका कार्यक्रमासाठी जाणार होते.त्यासाठी सरकारी विमानाने निश्चित ठिकाणी जाण्यासाठी राज्यपालांनी परवानगी मागितली होती. परंतू विमानास परवानगी नसल्याने राज्यालांना विमानातून खाली उतरावे लागले. राज्यपालांनी विमानात बसण्यापूर्वी काही काळ वाट पाहिली. त्यानंतर ते विमानात बसले आणि विमानात बसून २० मिनिटांनी खाली उतरले. कारण विमानाने हवेत उड्डाणच घेतले नाही. या प्रकारानंतर राज्यपाल खासगी विमानाने उत्तराखंड येथील कार्यक्रमास जाणार असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

राज्य सरकार अहंकारी - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच, जनतेला सर्व समजतं, जनताच याबद्दल निकाल देईल. हे सरकार किती अहंकारी आहे हे आज स्पष्ट झालं आहे, अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल - सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशी मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

ही तर सूडभावना- प्रविण दरेकर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी या प्रकाराला सूडाची भावना म्हटले आहे. प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे की, राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारून ठाकरे सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला आहे.हा सूड भावनेचा अतिरेक असून एवढ्या सूड भावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिलं नाही.राजकारण व सूड भावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे,पदाची गरिमा राखली पाहिजे. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिलं. अशी टीका त्यांनी केली आहे.