राजकीय

लोकसभेला उमेदवारी देताना पार्थ पवारांची किंमत कळली नव्हती का? - गिरीश बापट

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा चर्चा

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) |Pune -

पार्थ यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची किंमत किती, मॅच्युरिटी किती याची माहिती होती, त्यावेळी त्यांना अशीच उमेदवारी दिली का? असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि युवा नेते पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि पार्थ यांचे आजोबा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

राजकीय जीवनात अनेकांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील आहेत. त्यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून ते बोलले असतील असेही गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची केस सीबीआयकडे गेली आहे. त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी सुरू होईल. यामध्ये कोण आहे, कोण नाही, हे सत्य बाहेर येईल. सुशांत सिंह प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण होत नाही. सत्य लोकांसमोर येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल आमच्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतरच सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यामुळे आता लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com