Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबई महापालिका निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election)कोणी सोबत येईल की नाही याचा विचार न करता निवडणुकीच्या तयारी करा; असे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी बुधवारी पदाधिकाऱ्यांना दिले. त्याचवेळी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ( Shivsena & NCP )शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शिवसेनेतील बंडामुळे अनपेक्षितरीत्या सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता मुंबई महापलिकेच्या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक हे गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे.

.मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी मुंबईची निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ तसेच मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते वेळ देतीलच. मी देखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डात न्यायचे हे ठरवावे. त्याठिकाणी यायला मी तयार आहे, असे पवार म्हणाले.

कार्याध्यक्ष राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांनी निवडणुकीचा आरखडा तयार करावा. मुंबई महापालिकेत तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपला झेंडा फडकविण्याची संधी आहे, असे पवार म्हणाले. निवडणुकीसाठी सर्व ठिकाणी तयारी करा. दर २० दिवसांनी प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून आपण तेथील परिस्थितीचा अहवाल घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांच्याकडून नवाब मलिक यांचाही उल्लेख करण्यात आला. मलिक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्याविरोधात अद्याप ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील घराघरात पोहोचा : जयंत पाटील

या बैठकीत मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुंबईतील घराघरात पोहोचताना प्रत्येक वॉर्डमध्ये सदस्य नोंदणी वाढवा, अशी सूचना त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या