
दिल्ली | Delhi
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. 29 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही मोठी संधी आहे. यामुळे भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, विश्वात भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारताला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत आहे. दरम्यान देशाचे आणि जी-20 संबंधित महत्वाचे निर्णय अधिवेशनात होतील. असं ते म्हणाले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांची एकाच दिवसात नियुक्ती, चीनच्या सीमेवरील तणाव, महागाई, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फेरआढावा आदी मुद्दय़ांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. निवडणूक निकालांचा महिलांवर होणारा परिणाम पाहता तृणमूल काँग्रेस, जेडीयू या पक्षांनी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
23 दिवसांच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये 17 बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. तर 16 विधेयकं सादर केली जाण्याची शक्यता आहे. Trade Marks (Amendment) Bill, 2022, the Geographical Indications of Goods (Registration and Protection) (Amendment) Bill, 2022 and The Repealing and Amending Bill, 2022 ही विधेयकं सादर केली जाणार आहेत.
संसदेच्या मागील अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, अद्याप नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.