‘त्या’ भेटीवरून संजय निरुपम यांनी साधला खा.राऊत यांच्यावर निशाना

jalgaon-digital
2 Min Read

Mumbai | मुंबई

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतील भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधान आले आहे. मात्र या भेटीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

संजय निरूपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “असं वाटतं की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे'” तसेच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची ज्या हॉटेलमध्ये भेट झाली त्या नावाचा #GrandHyatt हा hashtag देखील वापरला आहे.

होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो – खासदार संजय राऊत

संजय राऊत माध्यमांशी बोलतांना म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आमची झालेली बैठक गुप्त नव्हती. ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही शनिवारी चर्चा केली. परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.’आमच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती,’ असेही ते म्हणाले.

राऊत म्हणाले, गोपनीय म्हणायचे तर आम्ही गोपनीय पद्धतीने भोजन केले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी आणि विरोधक भेटतच असतात. भाजपसोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले नेते मानतो, असेही त्यांनी सांगितले.

राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीस यांचा खुलासा

या भेटीनंतर शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती होणार का, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावत. ते म्हणाले, हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही. या भेटीत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नाही. ही भेट अराजकीय होती.

संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. ही मुलाखत अनकटच असेल आणि माझाही कॅमेरा तिथे असेल, असे मी त्यांना सांगितले. त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *