राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ.उदेसिंग पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ.उदेसिंग पाडवी

मोदलपाडा/ सोमावल - Modalpada - वार्ताहर :

जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्यासमोर पत्रकार परिषदेत उदेसिंग पाडवी हे आता झिरो झाले आहेत, त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश कसा दिला असे खोचक विधान केले होते.

मात्र, माझ्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीने त्या लोकप्रतिनिधीला आपोआपच उत्तर मिळाले आहे, असे माजी आ.उदेसिंग पाडवी यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

उत्तर महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याशी एकनिष्ठ राहिलो म्हणूनच मला हे पद मिळाले. या संधीचे मी नक्कीच सोनं करेल. जिल्ह्याबरोबच राज्यात राष्ट्रवादी पक्षाला वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. गटातटाचे राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी वाढविणार व पुन्हा एकदा राष्ट्रवादी ला गतवैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करणार.

उदेसिंग पाडवी ,राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, तळोदा

मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आ.उदेसिंग पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील नाराज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतला.

यात काँग्रेसचे युवक जिल्हाउपाध्यक्ष संदीप परदेशी, शहादा-तळोदा मतदार संघाचे काँग्रेसचे समन्वयक योगेश मराठे, काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांचे काका केसरसिंग क्षत्रिय, लहान बंधू विकास क्षत्रिय, माजी नगरसेवक गणेश पाडवी, युवक काँग्रेस तळोदा शहर सहसचिव शेख आदिल, भरत चौधरी, कमलेश पाडवी, धर्मराज सागर, नदीम बागवान, जयेश जोहरी आदी कार्यकर्त्यांनी उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला.

याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उदेसिंग पाडवी यांना प्रदेश उपाध्यक्ष निवडीचे पत्र दिले. यामुळे तळोदा शहरातील काँग्रेसला भगदाड पडले आहे. येत्या काळात काँग्रेसचे काय नुकसान होते याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस

काही महिन्यांपासून काँग्रेसच्या अंतर्गत धुसपुस सुरू होती. नाराज नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी यांनी काँग्रेसला अद्याप रामराम ठोकला नाही. तरीही या दोघा नगरसेवकांची नाराजी लपून राहिलेली नाही. म्हणून दीड वर्षांवर होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत हे दोन्ही नगरसेवक काँग्रेस मध्येच राहतील याची शाश्वती नाही.

राष्ट्रवादीत उत्साह

मागील काळात राज्यात भाजपा सत्तेत असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते.परंतु माजी आ.उदेसिंग पाडवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारेल. उदेसिंग पाडवी हे तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे अस्तित्व निर्माण करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com