
मुंबई | Mumbai
काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. "मी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा," असे रेड्डी यांनी खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.
त्यांच्या या राजीनाम्यानंतर रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण कुमार रेड्डी हे सध्या भाजप हायकमांडच्या संपर्कात आहेत. इतकेच नव्हे तर भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही पार पडल्या असल्याचे बोलले जात आहे.
किरण कुमार रेड्डी यांनी संयुक्त आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. २०१० ते २०१४ या कालावधीमध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. किरणकुमार रेड्डी यांनी २०१४ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी समैक्य आंध्र पार्टी या स्वत:च्या पक्षाची स्थापना केली होती. मात्र २०१८ मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले होते.
दरम्यान, रेड्डी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सांगितले की. ज्या लोकांनी पक्षाकडून सर्व काही मिळवलं आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवलं, त्यांना आता भाजपात गेलं पाहिजे.