Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

नाशिकच्या घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंबई / प्रतिनिधी

नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

- Advertisement -

यापूर्वी मी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, वेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिले होते. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्याना सुद्धा कल्पना दिली होती. परंतु सांगूनही हे सरकार, प्रशासन जागे होत नाही,असेही दरेकर म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

राज्य सरकारचे सर्वसामान्य लोकांकडे लक्ष राहिलेले नाही. फक्त सत्ता टिकवणे हेच आघाडीचे लक्ष आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडले आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

तर कामगारांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करा
राज्य सरकारला लॉकडाऊन लागू करायचा असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटे व्यवसायिक,कष्ट करणाऱ्या संघटित आणि असंघटित कामगारांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या