Friday, April 26, 2024
Homeराजकीयकांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

पुणे (प्रतिनिधी) –

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकरी संघटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा आघात होणार आहे अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दात धिक्कार करत असून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेत तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर विश्वासघात केला आहे. बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे, असे अखिल भारतीय किसान सभेने म्हटले आहे.

कांदा उत्पादक शेतकरी विरोधी तुघलकी निर्णय –राजू शेट्टी

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कांदा नियंत्रणमुक्त केला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला. आणि आता कांद्यावर निर्यात बंदी घातली. वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने आज पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतला. या बांडगुळांना पोसण्यासाठी शेतकऱ्यांप्रती बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतक-यांचा बळी घेणार आहात? असे त्यांनी नमूद केले आहे.

शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार—रघुनाथदादा पाटील

शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ” कांद्याचे दर थोडे वाढल्यानंतर केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारला शेतकऱ्यांना सुख लागु द्यायच नाही असे दिसते सरकारमधील शेतकऱ्यांची पोर म्हणणाऱ्यांनी राजीनामा देऊऩ आता पक्ष विसरुन शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. उद्या शेतकरी संघटना केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. याला जबाबदार केंद्र सरकार असणार आहे.‘‘

- Advertisment -

ताज्या बातम्या