Sunday, April 28, 2024
Homeराजकीयअधिकारी ओळखण्यास कमी पडलो!

अधिकारी ओळखण्यास कमी पडलो!

मुंबई । प्रतिनिधी

प्रशासनातील अधिकारी ओळखण्यास आपण खरेच कमी पडलो, अशी कबुली देत आता जे झाले ते झाले. ज्यांनी चुका केल्या अशा विश्वाासघातकी अधिकाऱ्यांना जरुर शिक्षा करु. पण, देवेंद्र फडणवीस सरकारवर जे धांदात खोटे आराेप करत आहेत, त्याविरोधात आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे आणि त्यांचे बिनबुडाचे आरोप खोडून काढले पाहिजेत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडली

- Advertisement -

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला पैसे वसुलीचा आरोप आणि गुप्तचर विभगाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा उघड झालेला फोन टॅपींग अहवाल या मुद्द्यांवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. मंत्र्यांनी फोन टॅपींगबाबत जोरदार संताप व्यक्त करत रश्मी शुक्ला यांच्या चौकशीची मागणी केली.

फोन टॅपींग प्रकरणाच्या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीत तोंड फोडले. शुक्ला यांनी फोन टॅपींगची परवानगी घेतली होती का? ज्यांची परवानगी घेतली त्यांचेच फोन टॅप केले का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या कटातील त्या मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप आव्हाड यांनी केला.

जर मंत्र्यांचे फोन टॅप होत असतील तर आम्ही कामे कशी करायची? असा सवाल महसूमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याचे कळते. जे अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी काम करत आहेत अशांना मोक्याच्या जागी नेमता कामा नये, अशी मागणी बैठकीत झाली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना कारभारात दक्ष राहण्याची सूचना केली. आपल्या समोर विरोधी पक्ष नाही तर भाजपसाखा शत्रू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उघडे पाडा, असे आवाहन त्यांनी मंत्र्यांना केले.

दरम्यान, साडेतीन तास चाललेल्या बैठकीत राज्यातील वाढता कोरोना संसर्ग, त्यावरचे उपाय यावर चर्चा झाली. तसेच कोरोना राज्यातील स्थितीवर आरोग्य विभागाने सादरीकरण केले. बैठकीच्या शेवटच्या तासात अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर पाठवण्यात आले. यावेळी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांच्या आरोपासंदर्भात चर्चा झाली.

निर्दोष असल्याचा अनिल देशमुखयांचा दावा

परमबीर सिंग यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मी निर्दोष असून कोणत्याही चाैकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितल्याचे कळते.

वर्षावर आघाडीची बैठक

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत रश्मी शुक्ला यांच्यावरील संभाव्य कारवाईबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे, नवाब मलिक आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या