शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

मुंबई | Mumbai

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, तसेच ही भेट नेमकं कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच यूपीएच्या नेतृत्वाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचा शोध सुरु आहे. यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाऊ शकतो का? याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. यात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला टक्कर द्यायची असेल तर यूपीएची पुनर्रचना करण्याची गरज आहे. यासंबंधी या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com