प्रचार तोफा थंडावल्या

उद्या मतदान
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठ दिवसांपासून धडाडणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा काल बुधवारी थंडावल्या.

येत्या 15 जानेवारी रोजी आता मतदान होणार असल्याने जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी आणि विजयाचे गणित जुळविण्यात उमेदवार आणि पॅनेलप्रमुख व्यग्र आहेत. त्यात त्यांना कितपत यश मिळतं हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

करोना संकटानंतर पहिल्यांदाच नगर जिल्ह्यांमधील 705 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. 5788 जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या 13194 उमेदवारांनी आणि त्यांच्या पॅनल प्रमुखांनी गेल्या आठ दिवसांपासून जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी पॅनल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंग भरला.

ग्रामपंचायतीचा मतदारसंघ अत्यंत छोटा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. तर काहींनी शक्तीप्रदर्शन करून गावात आपलीच वट असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. काही उमदेवारांनी तर शेतात राहणार्‍या मतदारांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेऊन आपल्यालाच मतदान करण्याचा आग्रह केला. तर काहींनी पदयात्रेवर भर दिला.

अनेक उमेदवारांनी पत्नी आणि मुलीला प्रचारात उतरवून महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. निवडून आल्यावर गावचा विकास कसा करणार? गावात कशा समस्या आहेत आणि जुन्या सदस्यांनी काम कसं केलं नाही हे अनेक उमेदवार मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. अनेकांनी भावकीतल्या लोकांची भेट घेऊन मतदान करण्याचीही विनंती केली. आता प्रचार संपल्याने आज रात्री उशिरापर्यंत गावातील गट, मंडळ आणि तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी सेटिंग्ज सुरू केली आहे.

त्यात या उमेदवारांना कितपत यश आलंय हे निकालाच्या दिवशीच समजून येणार आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदानासाठी सुट्टी

निवडणूक होणार्‍या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग कामानिमित्त निवडणूक होणार्‍या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेतरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. कारखाने, दुकाने, हॉटेलातील कामगारांसाठीही हे निर्देश आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com