मुंबई / प्रतिनिधी

विधानसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने करण्याची आपली परंपरा असल्याचे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत दिले.

विधानसभेत विरोधकांना वागणूक कशी दिली जाते. सरकारची भूमिका काय आहे?सरकारचा विरोधकांशी संवाद आहे का? यावर अध्यक्ष निवड एकमताने होणार हे अवलंबून असते. तथापि यासंदर्भात मित्र पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही फडणवीस यांनी सांगितले.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या १ मार्चपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानीला राज्य सरकार वाचवत आहे. वादग्रस्त वक्तव्य करूनही त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, हे सरकारच सरजीलचे आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी यावेळी केला.
सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याच्या आघाडी सरकारच्या घोषणवरही फडणवीस यांनी टिका केली.शरजील उस्मानी आणि सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल विचारले असता त्यांनी शरजीलचे संरक्षण करण्यात सरकार मश्गूल असल्याने त्याला अटक केली जात नाही. पण त्याला अटक व्हावी म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना घरात जाऊन ताब्यात घेतले जात आहे. आघाडीचे हे सरकार शरजीलचे आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
ज्यांनी चौकशीची मागणी केली आणि ज्यांनी मागणी मंजूर केली त्या दोघांचेही मानसिक संतुलन बरोबर नाही. त्याची तपासणी झाली पाहिजे. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. कारण भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही, असे ट्विट आहे. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असे म्हणणे चुकीचे असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारने अटक करावे, अशी टीका फडणवीस यांनी केली.