पुणे (प्रतिनिधि) :

सांगली महापालिकेत बसलेल्या झटकयानंतर भाजप आता पुणे महापालिकेतील महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या

निवडणुकीसाठी सावध झाला आहे. या निवडणुकीसाठी काही दगाफटका आपल्याच नगरसेवकांकडून होऊ नये म्हणून पक्षाकडून ‘व्हिप’ जारी करण्यात आला आहे.

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली होती.

पुणे महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून हेमंत रासने यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपतासाठी भाजपकडून मंजुश्री खर्डेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कालिंदा पुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे.

स्थायी समिती पक्षीय बलाबल –

भाजप – १०

राष्ट्रवादी – ४

काँग्रेस – १

सेना – १

पालिका पक्षीय बलाबल –

भाजप – ९९

राष्ट्रवादी – ४२

काँग्रेस – १०

सेना – १०

एमआयएम – १

मनसे – २