
दिल्ली | Delhi
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला. उद्धव ठाकरे यांच्या हातातील शिवसेना आणि निवडणूक चिन्ह काढून घेण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला दणका देण्याच्या तयारीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करण्यात येत असून, मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष या पक्षांनाही आयोगाने नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. खरं तर २०१४ च्या लोकसभा निकालानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय कम्युनिष्ट पार्टीच्या दर्जा विषयी फेरविचार सुरु झाला होता, परंतु त्यावेळी निवडणूक आयोगने ही प्रक्रिया पुढे ढकलली होती. त्यानंतर २०१९ ला सुद्धा ही प्रक्रिया आयोगाने पुढे ढकलली.
मात्र आता तिन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकल्यास शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल.
१९६८ सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलवर निवडणूक आयोगाचं समाधान झालं नाही, तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय आहेत अटी?
तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने 2 टक्के जागा जिंकल्या पाहिजे.
लोकसभेच्या चार जागांच्या व्यतिरिक्त एखाद्या पक्षाला लोकसभेतील किमान सहा टक्के किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपैकी किमान 6 टक्के मते मिळणे आवश्यक आहे.
चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. या अटीच्या आधारे 2019 मध्ये NPP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. आता गुजरातच्या निकालानंतर आम आदमी पार्टीही ही अट पूर्ण करेल असा अंदाज आहे.
यापैकी एकही अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
सध्या किती आहेत राष्ट्रीय पक्ष?
भारतीय जनता पक्ष (भाजप)
काँग्रेस
बहुजन समाज पक्ष (BSC)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
तृणमूल काँग्रेस (TMC)
नॅशनल पीपल्स पार्टी (NPP). NPP हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली.
'आप'लाही लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची शक्यता
दिल्लीच्या राजकारणातून उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाला गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. गुजरातमध्ये 'आप'ने ५ जागा जिंकल्या होत्या. सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाला एकूण मतांपैकी ६.८ टक्के मते मिळाली आहेत. येथे आपचे २ उमेदवार विजयी झाले होते. ऑगस्ट महिन्यातच निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 'आप' गोव्यातही मान्यताप्राप्त पक्ष बनला होता.