एकनाथराव खडसे म्हणतात दोन दिवस थांबा अधिकृत बातमी देतो

भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रविवारी समाजमाध्यमावर पसरली होती
एकनाथराव खडसे म्हणतात दोन दिवस थांबा अधिकृत बातमी देतो

जळगाव ।प्रतिनिधी Jalgaon

भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सूरु असताना खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रविवारी समाजमाध्यमावर पसरली होती.

दरम्यान याबाबत खडसे यांच्याशी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता मी अजून भाजपातच आहे असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाही त्यामुळे माझी अधिकृत भूमिका जाणून घ्यायची असल्यास दोन दिवस वाट बघा मंगळवारी सांगतो असे सांगत खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाच्या राजीनामा दिल्याच्या अफवाना पूर्णविराम दिला .

भाजपात नाराज एकनाथराव खडसे राष्ट्रवादी मध्ये जात असल्याचा व त्यांचा प्रवेश निश्चित असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आहेत .खडसे यांच्या बाबतीत दररोज नवीन माहिती समोर येत असताना खडसे मात्र या विषयावर काहीही बोलायला तयार नसल्याने आणखीनच संभ्रम वाढला आहे.

दरम्यान खडसे आपल्या वैयक्तीक कामासाठी मुंबई येथे गेले असतानाही खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही भेट झाली नाही .त्यातच खडसे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या .दरम्यान असे काहीही घडले नाही.

घटस्थापनेच्या मुहूर्त हुकल्यानंतर आता खडसे दसऱ्याला राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना रविवारी खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून ते गुरुवारी राष्ट्रवादी मध्ये जातील अशी बातमी आली .दरम्यान ही चर्चा सूरु झाल्यानंतर खडसे प्रेमी आणि समर्थकांनी जळगावातील खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यावर गर्दी केली होती .दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीचे देखील सारखे फोन येत असल्याने खडसे यांनी आपला फोनच बंद करून ठेवला.

खडसे यांचेशी संपर्क साधण्यासाठी त्यांना फोन लावला असता त्यांचा फोन बंद आल्याने त्यांचे समर्थक व खडसे परिवाराच्या सावली प्रमाणे त्यांच्या जवळ असलेले माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी देखील असा काहीही विषय नाही खडसे साहेब अद्याप भाजपातच आहेत असे सांगितले.

शिवाय कोणताही राजीनामा दिलेला नसून मला अधिकृत काही सांगायचे असल्यास दोन दिवस वाट बघा मंगळवारी मी बोलेन असा खडसे यांच्या प्रसारमाध्यमांसाठी निरोप असल्याचे देखील लाड वंजारी यांनी सांगितले त्यामुळे खडसे यांच्या राजीनाम्याबाबत रविवारी प्रसारित झालेली माहिती अफवाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com