Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमहापालिकेवर अस्थिरतेचे सावट

महापालिकेवर अस्थिरतेचे सावट

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात राजकीय समीकरणांची नव्याने गणिते मांडली जाऊ लागली आहेत.

- Advertisement -

यात शहर महापालिकेचाही समावेश असून या ठिकाणी सत्ताधारी भाजपाला शह देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी तडकाफडकी श्री. खडसेंची मुक्ताईनगर येथे जावून भेट घेतली त्यापाठोपाठ जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली.

एकनाथराव खडसे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजपाच्या ताब्यातील नगरपालिका, महानगरपालिकेत धक्कातंत्र वापरले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्या अनुषंगानेच जळगाव महापालिकेतील भाजपाच्या नाराज नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या नगरसेवकांना आपल्यावरील अन्याय दूर व्हावा असे वाटत असेल तर त्यांना खडसेंसोबत जावे लागेल थोडक्यात पक्षांतर करावे लागेल.

ही गोष्टही अशक्य नाही. खडसेंनी ठरवले तर काहीही होवू शकते. राजकारणात केव्हाही कुठलीही गोष्ट होवू शकते.

एकूण 75 नगरसेवक महानगरपालिकेचे सदस्य आहेत. यात भाजपाचे एकूण 57 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 15 आणि एमआयएमचे तीन नगरसेवक आहेत.

भाजपाने तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात दीड वर्षांपूर्वी महापालिकेतील सत्ता आपल्याकडे खेचून घेतली मात्र, अतिशय स्पष्ट बहुमत असूनदेखील भाजपा जळगावचा चेहरा बदलू शकलेला नाही. पक्षाकडे म्हणायला 57 जणांचे बहुमत आहे मात्र, एकवाक्यता एकातही नाही अशी स्थिती आहे.

शहरातील कामे होत नाहीत, रस्त्यांबाबत तर बोलायचेच नाही, स्वच्छतेच्या ठेक्यावरून टक्केवारीचे गंभीर आरोप झाले आहेत, पथदिव्यांखालीच अंधार असतो. याशिवाय महापौर, उपमहापौर व स्थायी समितीचे सभापतिपद यावरून भाजपा नगरसेवकांमध्ये असलेली अस्वस्थताही कारणीभूत ठरु शकते.

आतापयर्र्त विशिष्ठ लोकांनाच संधी दिली जात असल्याची ओरड होत राहिली आहे. महापालिकेत सत्ता मिळविण्याच्या नादात त्यावेळी अनेकांना विविध आश्वासने देण्यात आली होती. सुरेशदादा जैन गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमदेवार फोडून त्यांना भाजपात घेतले गेले होते. या सर्वांना सांभाळताना नेतृत्त्व अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे. थोडक्यात अन्याय आहे परंतु, न्याय नाही, अशी स्थिती आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे सत्तेत नांदत आहेत. हेच सूत्र जळगाव महापालिकेत स्वीकारले जाऊ शकते. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. त्यांच्या सोबतीने महापालिकेत सत्तापालट करायचा म्हटल्यास भाजपाला सुरुंग लावावा लागेल. त्यांचे नगरसेवक फोडून त्यांना राष्ट्रवादीत घ्यावे लागेल.

दुसरा पर्याय महापालिकेवर प्रशासक नियुक्तीचा असू शकतो. महापालिका अधिनियम कलम 452 नुसार, महापालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. महापालिका आपली विहित कर्तव्ये पार पाडत नसेल, अधिकारांचा दुरुपयोग करत असेल अशा स्थितीत ही कारवाई होऊ शकते. त्यापूर्वी महापालिकेला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. मात्र, त्यानंतरही सरकारचे समाधान झाले नाही, तर बरखास्तीची कारवाई होऊ शकते.

राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर भाजपापासून दुरावलेले एकनाथराव खडसे हे जिल्ह्यात आले असता महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी नुकतीच त्यांच्या मुक्ताईनगर येथे जावून भेट घेतली चर्चा आहे.

या भेटीत नागरी सुविधांबाबत चर्चाविनिमय झाले असल्याचे बोलले जात असले तरी यानिमित्ताने खडसे हे महापालिकेत हस्तक्षेप करु लागले असल्याचे चित्र आहे. एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाद हा शहरवासीयांसह जिल्ह्यात नवीन नाही.

महाजन यांनी जळगाव महापालिका भाजपाकडे खेचून आणली आहे. पण खडसे आता भाजपामध्ये नाहीत. महाजन व भाजपाचे ते विरोधक झाले आहेत. त्यामुळे खडसे यापुढे कोणती रणनीति आखतात यावरच जळगाव महापालिकेचे भवितव्य निश्चित होणार आहे. या सर्व बदलत्या घटनांमुळे मात्र आजतरी मनपावर अस्थिरतेचे सावट निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या