हुडको कर्जमाफीसाठी महापौरांसह मनपाविरोधी पक्षनेते खडसेंच्या दारी

हुडको कर्जमाफीसाठी महापौरांसह मनपाविरोधी पक्षनेते खडसेंच्या दारी

तब्बल पाऊणतास बंदद्वार चर्चेने तर्क-वितर्कांना उधाण; शहराच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महापालिकेकडून हुडकोच्या कर्जाची परतफेड सुरु आहे. सद्यस्थितीत 71 कोटी रुपये देणे बाकी असून दरमहा महापालिका हुडकोला तीन कोटी रुपये याप्रमाणे कर्जफेड करत आहे. हुडकोचे कर्ज माफ व्हावे या संदर्भात आज बुधवारी महापौर जयश्री महाजन व मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंची भेट घेतली.

अर्थमंत्री अजित पवार यांना विनंती करुन हे कर्ज माफ करण्याबाबत चर्चा करावी अशी विनंती यावेळी महापौरासह विरोधी पक्षनेत्यांकडून खडसेेंना करण्यात आली. तसेच याबाबतचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

यादरम्यान तब्बल पाऊण तास खडसे- महापौर व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यात बंदद्वार काही राजकीय तसेच शहरातील विकासाच्या विषयावरही चर्चा झाल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

माजी पालकमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केली

महापौर जयश्री महाजन, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसेच अभिषेक पाटील हेसुध्दा यावेळी उपस्थित होते.

तब्बल पाऊण तास बंदद्वार महापौर महाजन, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, डॉ. गुरुमुख जगवानी, एकनाथराव खडसे यांच्या चर्चा झाली. चर्चेनंतर एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हुडको कर्ज माफ करण्यासह, शिवाजीनगर उड्डाणपूलाचे रखडलेले कामकाज याप्रमाणे शहराच्या विकासाच्या विषयासह काही राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

माजी पालकमंत्र्यांनी महापालिकेला कर्जमुक्त करुन असे आश्वासन दिले होते. हुडकोचे सव्वाशे कोटी रुपये शासनने भरले असे सांगितले होते. कर्जमुक्त करण्याचे केवळ आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात महापालिका कर्जमुक्त झाली नाही.

आजही महापालिकेकडे हुडकोचे 71 कोटी कर्ज देणे बाकी असून दरमहा 3 कोटी याप्रमाणे महापालिका कर्जफेड करत आहेत. कर्जमुक्त करण्याचे आश्वासन देवून माजी पालकमंत्र्यांनी सर्वांची दिशाभूल केली असल्याचा टोला खडसे यांनी प्रत्यक्ष नाव न घेता गिरीश महाजनांवर हाणला.

उड्डाणपूलाच्या कामाला येणार वेग

शिवाजीनगर येथील उड्डाणपूलाचे कामाला विलंब होते. ठेेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असल्याचे असून त्याबाबत मार्ग काढावा, याबाबत महापौरांनी खडसेंकडे विनंती केली. यात महावितरणचे पाले स्थलांतरासह विविध अडचणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कामाची रक्कमही वाढत असल्याने ते काम लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी चर्चा केली असून वेग येईल.

भाजप नगरसेवकांचा आणखी एक गट संपर्कात

एकनाथराव खडसे पुढे बोलतांना म्हणाले की, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी काही भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याबाबतची माहिती दिली. त्यावर चर्चा करण्यात आली.

भाजपचे काही नगरसेवक माझ्याही संपर्कात असल्याचेही यावेळी खडसे यांनी सांगितले. दरम्यान संपर्कात असलेले भाजपचे नगरसेवक शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात याबाबत मात्र सांगण्यात आले नाही. मात्र लवकरच संबंधित भाजपच्या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेण्याबाबतही महापौर व विरोधी पक्षनेते यांच्यासोबत चर्चा झाल्याचे यावेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

...तर तीन कोटी शहराच्या विकासावर खर्च

हुडकोचे 71 कोटी रुपये महापालिकेला देणे आहे. त्यानुसार दरमहा तीन कोटी रुपये महापालिका अदा करत आहे. जर हुडकोचे बाकी असलेले कर्ज माफ झाले, दर महिन्याला दिले जाणारे तीन कोटी रुपये वाचतील. तसेच या पैशांमधून शहरातील विकासकामे करता येतील. अशी माहिती महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीचे मंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्याने तसेच एकनाथराव खडसे हे ज्ेयष्ठ नेते असल्याने खडसे यांनी अजित पवार यांच्याकडे कर्ज माफ करण्याबाबत विनंती करावी, यासाठी खडसेंची भेट घेतल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com