एकनाथ शिंदे गट गोव्यात दाखल

गुवाहाटीतून जय महाराष्ट्र म्हणत मानले आभार
एकनाथ शिंदे गट गोव्यात दाखल

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

गेले आठ दिवस आसामची राजधानी गुवाहाटीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात रणनीती ठरविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने बुधवारी आपला मुक्काम गोव्यात हलविला. शिंदे गटाचे ३९ आणि काही अपक्ष आमदार आज विशेष विमानाने गोव्यात पोहचले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना आज, गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हे बंडखोर आमदार आज सकाळी गोव्यातून मुंबईत दाखल होतील.

२० जून रोजी विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना नेतृत्वाला गुंगारा देत थेट सूरत गाठले. सूरतमध्ये शिवसेनेकडून शिंदे यांची मनधरणी करण्यचा प्रयत्न झाला, परंतु, एकनाथ शिंदे हे आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या गटाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून शिंदे यांनी सूरतमधून भाजपशासित आसामच्या गुवाहाटीत आपला मुक्काम हलविला.

गुवाहाटीत पोहचल्यानंतर शिंदे गटाने हळूहळू आपले पत्ते खुले केले. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार गटागटाने तर कधी एकेकट्याने शिंदे यांच्या गोटात दाखल होत होते. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी हकालपट्टी करून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाने या निर्णयाला गुवाहाटीतून शह दिला. शिंदे यांनी आपल्या आमदारांची बैठक घेऊन गटनेते पदी स्वतःची नेमणूक करताना मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नेमणूक केली. त्यानंतर शिंदे यांनी गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांना पुढे आणले. केसरकर यांच्यासह अनेक आमदारांच्या माध्यमातून शिंदे यांनी हिंदुत्वाची आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका मांडत राहिले.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने बंडखोर १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी याचिका दाखल केल्यानंतर शिंदे गटाने गुवाहटीतून या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने नोटीस बजावलेल्या १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिल्यानंतर शिंदे आणि भाजप गोटात हालचालींना वेग आला. मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी बडोद्यात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होती.

भाजपने मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकारला बहुमत सिद्ध सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. ही मागणी मान्य करत राज्यपालांनी आज, ३० जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून बहुमत सिद्ध करण्याची सूचना ठाकरे सरकारला केली आहे. त्यामुळे आज गुवाहाटी सोडण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले.

राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाची सूचना केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटीतील आपला मुक्काम हलविण्याचा निर्णय घेतला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला वेळेत उपस्थित राहता यावे म्हणून शिंदे गट आज गोव्यात मुक्कामी आला. आता हा गट विशेष विमामाने आज सकाळी मुंबईत येईल. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून निघताना जय महाराष्ट्र म्हणत गेल्या काही दिवसात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com