Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? CM शिंदेंचा ठाकरेंना सवाल

राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? CM शिंदेंचा ठाकरेंना सवाल

मुंबई | Mumbai

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. काल मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना थेट सुनावलं. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सावरकर यांच्यावर होणारा अवमानाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडात मारली होती. तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून दाखवावे, असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली. स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षामुळे आपण आज स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. ज्या देशभक्तांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांची निंदा करतो. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहे. आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्या एकाही नेत्याने विधानसभेत याचा निषेध केला नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

शिंदे म्हणाले की, सावरकर अंदमानातील ज्या तुरुंगात राहिले, तिथे जर राहुल गांधी एक दिवस राहून आले तर त्यांना याची जाणीव होईल. त्याचा निषेध सर्वांनी करायला हवा होता. पण ज्यांनी त्यांचा अवमान केला, ते वारंवार सांगत आहेत. मी सावरकर नाही गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकर व्हायला जेवढा त्याग व प्रेम असायला हवे ते तुमच्यात नाही. तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. यापेक्षा जास्त दुर्दैव काय असू शकते.

दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी कायद्यानूसार गेली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. एकीकडे राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करीत आहेत. तर दुसरीकडे अधिवेशनात काँग्रेसचे आमदार मूग गिळून गप्प होते. का आणि कशासाठी महाविकास आघाडीसाठी का? असाही खोचक सवाल त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधत केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या