Friday, May 10, 2024
Homeराजकीयखडसेंना मिळणार मंत्रीपद ; राष्ट्रवादीच्या ‘या’ दोघांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा!

खडसेंना मिळणार मंत्रीपद ; राष्ट्रवादीच्या ‘या’ दोघांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा!

मुंबई –

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे हे उद्या मोठे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे

- Advertisement -

राष्ट्रवादीची ताकद वाढणार असली तरी खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्याला लागणार असल्याची चर्चा आहे.

सध्या ठाकरे मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्या आहेत. मंत्रिमंडळात एकही जागा शिल्लक नसल्याने एखाद्या नव्या चेहर्‍याला संधी द्यायची झाल्यास संबंधित पक्षाच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार अशी आजची परिस्थिती आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे हे उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ज्यांनी उभ्या महाराष्ट्रात भाजपला उभारी देण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवले त्याच नेत्याला अपमानीत होवून पक्ष सोडावा लागत आहे. अशी भावना जळगावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. खडसे सारखा वजनदार नेता पक्षात प्रवेश करणार असल्याने साहजिकच राष्ट्रवादीकडून खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार आहे. सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील सर्व मंत्रीपदे भरली गेल्याने राष्ट्रवादीच्या कोणत्याही एका मंत्र्याला राजीनामा द्याला लागणार आहे. त्यामुळे एकीकडे खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

खडसे हे वजनदार ओबीसी नेते असल्याने त्यांना मंत्री केले जाणार यात शंका नाही. खडसेंना मंत्री करण्याकरिता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रकृतीच्या कारणास्तव सध्या मंत्री असूनही फारसे सक्रीय नसल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येवूनही त्यांनी त्याकडे प्रकृतीच्या कारणास्त लक्ष न दिल्याने त्यांची ही जबाबदारी काढून घेण्यात येवून सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री दत्ता भरणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर दुसरीकडे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यातील करमुसे या इंजिनिअरला केलेल्या मारहाणीचे आणि अपहरणाचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या प्रकरणात भविष्यात न्यायालयाने गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्यावर ताशेरे ओढल्यास राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते, अशी कुजबुज राष्ट्रवादीत आहे. आव्हाड यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जावू शकते अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्या होणार्‍या खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण असले तरी पक्षाच्या काही मंत्र्यांचे चेहरे मात्र चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.खडसे यांच्या या प्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एका मंत्र्याचा राजीनामा पक्षाला घ्यावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या