खडसे - महाजन यांच्यात रंगला पुन्हा कलगीतुरा

खडसे - महाजन यांच्यात रंगला पुन्हा कलगीतुरा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची ऑडीयो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा खडसे - महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

खडसे यांनी तुमचा जामनेरचा आमदार*** का? तो फक्त पोरींचेच फोन उचलतो असे विधान केले आहे, याच विधानानंतर खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यामुळे ते असे बोलत असल्याचे वक्तव्य करत आमदार महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले, खडसे

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथील एका मुलाने फोनवरुन पाण्यासंदर्भात खडसेंकडे व्यथा मांडली. यावर बोलतांना खडसे म्हणाले, तुमचा जामनेरचा आमदार*** का? गिरीश इकडे तिकडे बायकांच्या मागे फिरतोय का? असे म्हणताच गिरीश महाजन फोन उचलत नसल्याचे त्या गावकर्‍याने म्हटले. त्यावर खडसे यांनी तो फक्त पोरींचेच फोन उचलतो, मतदार संघातील प्रश्न सोडवायचे सोडून पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, असा टोला लगावला. याबाबतची ऑडीयो क्लिप सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन

मी खडसे यांना दोष देणार नाही. त्यांचे वाढते वय, त्याचबरोबर आजार, जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला बिचार्‍याला आमदारकी मिळत नाही, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे झालेले आहे असे वाटते. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कुठलाही रोष नाही. त्यांनी बोलत रहावं, लोकांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे कोण काय, कोण काय नाही. परंतू खूप वेगळ्या मनस्थितीत ते आहेत. राष्ट्रवादीत जावून त्यांना कुठलीही आमदारकी मिळालेली नाही, लोकांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुलीला नाकारले. अशी अवस्था कोणाचीही होईल. त्यामुळे ते असे बोलताहेत, अशा शब्दात आमदार महाजनांनी खडसेंना प्रत्युत्तर दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com