ईडी अधिकाऱ्यांची होणार चौकशी - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

केंद्र-राज्य संघर्षाची चिन्हे
ईडी अधिकाऱ्यांची होणार चौकशी - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut )यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या ( ED ) अधिकाऱ्यांवर केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांची मुंबई पोलिसांच्या एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil )यांनी मंगळवारी येथे दिली. आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीला ( SIT) हवा तितका वेळ दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या आरोपानंतरही गृह खात्याकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. संजय राऊत यांनी गृह खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वळसे-पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती.

या बैठकीत ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार वळसे पाटील यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चौकशीच्या निर्णयाची माहिती दिली.

ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांची चौकशी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल.

आधी उपायुक्त दर्जाचा अधिकारी ही चौकशी करत होते. पण याप्रकरणी आर्थिक गुन्हा नसून हे खंडणीचे प्रकरण असल्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला वर्ग करण्यात आली आहे.

प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रांत तपासाचा अनुभव असलेल्या अधिकारी या विशेष पथकात आहे. या प्रकरणाच्या हस्तांतराची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच तक्रारदारासह इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.