Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे संजय राऊतांच्या घरी ईडीचं...

Sanjay Raut : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक पोहचलं?

मुंबई | Mumbai

शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ईडीचे (ED) पथक काम करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान ही कारवाई ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) सुरू आहे. मागील काही महिन्यात संजय राऊत यांची ईडी कार्यालयामध्येही चौकशी झाली होती. पण, पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं काय? आणि याच्याशी संजय राऊत यांचा संबंध कसा आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

काय आहे प्रकरण?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून ६७२ फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून १०० कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. २०१० मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील ५५ लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या