गुन्हा मागे घ्या अन्यथा स्वातंत्र्य दिनी आंदोलन

कॅन्सरग्रस्त शेतकर्‍याच्या मदतीसाठी ज्ञानेश्वर भामरेंची भूमिका
गुन्हा मागे घ्या अन्यथा स्वातंत्र्य दिनी आंदोलन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील वरुळ येथील कॅन्सरग्रस्त शेतकर्‍यांवर चुकीच्या पध्दतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे न घेतल्यास स्वातंत्र्य दिनी आंदोलन करण्याचा निर्धार जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांना पत्र देवून आपला रोष व्यक्त केला.

मौजे वरुळ ता.शिंदखेडा येथील कॅन्सरग्रस्त शेतकर्‍यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याबाबत आपण यापुर्वीही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हा परिषद ही शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आहे की, त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी? असा सवाल करुन आपण सभेचे कामकाज सोडून बाहेर पडलो होतो.

आपल्या अपेक्षप्रमाणे शेतकर्‍याला न्याय देण्याची भूमिका वठवली जाईल असे वाटले होते. परंतू या संदर्भात कोणत्याही हालचाली होतांना दिसत नाही. वरुळ येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी प्रकाश पितांबर पाटील यांचेवर अनधिकृत बियाणे साठवणूक केल्यामुळे जि.प.कृषि विभागाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात रजि.क्रं.0107 दि.26 मे 2021 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु सदर शेतकरी हा आर्थिक परिस्थितीने अत्यंत नाजूक असून तो कॅन्सग्रस्त आहे.

सदर शेतकर्‍याने कोणासही माल विकलेला नाही. स्वतःच्या शेतीसाठी बियाणे आणले होते. कृषि अधिकार्‍याने संबंधित दुकानावर गुन्हा न दाखल करता शेतकर्‍यावर चुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या कुटूंबावर अन्याय केला आहे.

या शेतकर्‍यास मे. उच्च न्यायालयापर्यंत दाद मागून जामीन घ्यावा लागला आहे. शेतकर्‍यावर गुन्हा दाखल करण्याबाबत कोणताही शासनाचा नियम नसतांना चुकीचा गुन्हा दाखल करुन अन्याय केला जातो आहे.

या संदर्भात चौकशीही झाली आहे. त्यामुळे विक्रेत्याला सोडून शेतकर्‍यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी मोर्चा काढून आंदोलन केले जाईल. असे श्री. भामरे यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com