Sunday, May 5, 2024
Homeराजकीयजिल्ह्यातील खडसे समर्थकांचे वेट अ‍ॅण्ड वॉच

जिल्ह्यातील खडसे समर्थकांचे वेट अ‍ॅण्ड वॉच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने नगरमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे.

- Advertisement -

खडसे यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी संख्या जिल्ह्यातही आहे. मात्र सध्या त्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. आगामी काळात जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काही घडामोडी होतील, असा अंदाज काहींनी व्यक्त केला.

खडसे यांच्या घोषणेने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट झाली. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने त्याबाबतही संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. गेली 40 वर्षे खडसे यांनी राज्यात तळागळात भाजप वाढीसाठी संघर्ष केला, याची आठवण नगरमधील कार्यकर्त्यांनी आवर्जून काढली.

मुंडे आणि खडसे या जोडीने बहुजनांना एक प्रबळ राजकीय पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र अलिकडच्या काळात त्यांच्याबाबत जे घडले, ते अनपेक्षीत होते. राज्यात भाजपमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी कुचंबणा सुरू आहे, त्याचे खडसे हे प्रतीक होते, अशी प्रतिक्रीया एका कार्यकर्त्याने नोंदविली. खडसे पक्षात प्रबळ असताना जिल्ह्यात अनेकजण आपण ‘त्यांचा माणूस’ असल्याचे ठसविण्यासाठी झटत.

मात्र आज त्यांनी जाहिरपणे या विषयावर बोलणे टाळले. जिल्ह्यात दोन माजी आमदार, 2014 मध्ये खडसेंचेच बोट धरून राष्ट्रवादीतून भाजपात आलेले एक विद्यमान आमदार आणि खासदार दिलीप गांधी विरोधातील नगर दक्षिण मतदारसंघात माजी कार्यकर्त्यांचा गट हे खडसे समर्थक मानले जात. अलिकडच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे खडसेंच्या जाण्याने पुढील काळात जिल्ह्यात काय परिणाम होणार याचा अंदाज आताच बांधणे कठीण असल्याचे मत एकाने नोंदविले.

राष्ट्रवादी हाऊसफुल्ल

सध्या जिल्ह्यात महाविकास आघाडी हाऊसफुल्ल आहे. 12 पैकी 9 आमदार आणि महत्त्वाच्या सर्वच सत्तास्थानांवर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. या स्थितीत राष्ट्रवादीतील राजकीय आगंतुकांना जिल्ह्यात तरी काही हाती लागणे शक्य नाही. त्यामुळे खडसेंच्या निर्णयाचा जिल्ह्यात परिणाम जाणवणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. राष्ट्रवादीला मात्र ‘बहुजन’ राजकारण अधिक मजबूत करण्यासाठी खडसेंची मदत होणार आहे.

आ.पवारांचा भाजपला चिमटा

राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी खडसे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘राष्ट्रवादीला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे. ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते.’ असे ट्विट करत त्यांनी भाजपला चिमटा काढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या