अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्जाचा पाऊसच पडला.

काल एकाच दिवसात 14 तालुक्यांतून 1 हजार 445 उमदेवारी अर्ज दाखल झाले असून यामुळे आतापर्यंत दाखल अर्जाची संख्या आता 1 हजार 612 झाली आहे. अजून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस बाकी असून या काळात विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल करण्यास वेळ असून येणार्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने उमदेवारी अर्ज दाखल होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्यास उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

शेवटच्या तीन दिवसांत गर्दी होण्याचा अंदाज आल्याने प्रत्येक तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यादृष्टीने उपाययोजना आणि पोलीस बंदोबस्त लावला होता. सोमवारी एकाच दिवशी 1 हजार 445 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उर्वरित दोन दिवसात दाखल होणार्या अर्जाची संख्या मोठी राहणार आहे. यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार असून माघारीच्या वेळी इच्छुकांची समजूत घालतांना नेत्यांची कसरत होणार आहे.

सोमवारी दाखल अर्ज

अकोले 71, संगमनेर 76, कोपरगाव 45, श्रीरामपूर 98, राहाता ा54, राहुरी 68, नेवासा 186, नगर 113, पारनेर 120, पाथर्डी 114, शेवगाव 130, कर्जत 116, जामखेड 126 आणि श्रीगोंदा 128 असे 1 हजार 445 अर्ज दाखल झाले आहेत.