महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भाजपने तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना पटोले म्हणाले की, भाजपचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्येही भाजपाचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात आणि केंद्रातही परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा दिसत आहे.

महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याचे दिसत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. ईडी सरकार बहुमताचा दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण आगामी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे त्याच मानसिकतेतून हा सत्तापिपासू उद्योग केला गेला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याच्या वल्गनाही ते करत असतात. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत? असा सवाल पटोले यांनी केला.

कोण-कोणाबरोबर सत्तेसाठी घरोबा करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसत आहे. जनतेला हे फोडाफोडीचे राजकारण अजिबात आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने जाण्याने काँग्रेस आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही उलट काँग्रेस पक्ष जास्त ताकदीने आणि जनतेच्या विश्वासावर मोठ्या बहुमताने निवडून येईल. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तसेच केंद्रातही सरकार सत्तेत येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com