निरीक्षकांसमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा
राजकीय

निरीक्षकांसमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा

राष्ट्रवादीच्या बैठकीत नाव घेण्यावरून वाद; दहा मिनिटात सभा गुंडाळली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व ग्रामीण शाखेच्या बैठकीत आज पक्षाच्या निरीक्षकांसमोरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. बैठकीच्या सुरूवातीलाच पदाधिकार्‍यांची नावे घेण्यावरून वाद झाला. त्यावरून काही पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांवर धावून येत हमरीतुमरी झाली. एकच गोंधळ झाल्याने सभा गुंडाळण्यात आली.

शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर व ग्रामीण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहराची सकाळी दहा वाजेची बैठक दुपारी बारा वाजता हॉलमध्ये सुरू झाली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. सभेला पक्षाचे निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, अविनाश आदिक तसेच इर्शाद जहागिरदार, शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, माजी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, चंद्रकांत केले, अनिल मुंदडा आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातील पक्ष निरीक्षकांनी प्रत्येकाने पक्षाला साजेसे असे काम केले पाहिजे. जिल्हयात राष्ट्रीवादी पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

त्या दरम्यान उपस्थित सन्मानिय सदस्यांचे नावे घेत असतांना नावांवरून वाद झाला. नंदु येलमामे यांच्यासह इतरांनी आमच्या नेत्यांचेही नाव घ्यावे, असे सांगितले. त्यानंतर हा वाद झाला. त्यामुळे काही पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसमोर येत हमरीतुमरी झाली.

यावेळी व्यासपिठावर बसलेले सर्वच पदाधिकारी उभे राहिले. तर कार्यकर्त्यांनीही गर्दी केली. वाद वाढण्यापुर्वीच ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी वाद मिटवत सर्वांना शांत केले. तसेच बैठक देखील झाल्याचे जाहिर केले.

त्यानंतर दोन्ही निरीक्षकांनी कार्यालयात प्रथम ज्येष्ठ पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांना भेटण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर महिला पदाधिकार्‍यांची संवाद साधला. त्यानंतर बंद खोलीत बैठका सुरू होत्या.

दरम्यान वाद झाल्यानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनातून काढता पाय घेतला. तर गर्दीमुळे अनेक जण मैदानात उभे होते. यावेळी बाहेर उभ्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलले जाते. परस्पर पदे दिली जात असल्याचे बोलत नाराजी व्यक्त केली.

दुपारी धुळे ग्रामीणची बैठक झाली. त्यात काही पदाधिकारी व कार्यर्त्यांनी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे भाजपाच्या पदाधिकार्‍यांसोबत फिरतात त्यामुळे आमची अडचण होत असल्याची भावना व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com