..तर देश खिळखिळा होईल – दिलीप वळसे पाटील

jalgaon-digital
2 Min Read

पुणे |प्रतिनिधी| Pune

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, अशी खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मॅक्सनोव्हा हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात सध्या विविध प्रश्न आहेत. मात्र संवेदनशील विषयावर बोलून वाद निर्माण करण्याचे काही जणांचे प्रयत्न आहेत. सरकारला अडचणीत आणण्याचेच हे प्रकार आहेत, असे वळसे पाटील म्हणाले. आज महागाई वाढत आहे. इंधनाचे दर वाढत आहेत. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.

विकासावर बोलायचे सोडून मशिदीवरील अजानवर बोलायचे. हनुमान चालिसावर बोलायचे आणि धर्माधर्मात, दोन वर्गात वाद निर्माण करून राजकारण अस्थिर करायचे काम सुरू आहे. पण यातून राजकारण अस्थिर होणार नाही, तर देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

‘शरद पवारांवरील टीका अयोग्य’

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही. मागील कित्तेक वर्षे राजकारणात राहून विविध जातींमध्ये एकता साधण्याचेच काम केले. त्यामुळे अशा ज्येष्ठ नेत्यावर टीका करणे योग्य नसल्याचे वळसे पाटील यांनी नमूद केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *