धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेच्या 197 जागा कराराने दिल्या आहेत. त्यांच्या कराराची मुदत संपत आहे. त्यात काँग्रेस भवनाचाही समावेश आहे.

त्यामुळे काँग्रेस भवनापासून कारवाईला सुरुवात करावी, असे निर्देश सभापती सुनिल बैसाणे यांनी दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन साप्ताहिक सभा आज सभापती सुनिल बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

सभेला उपायुक्त शांताराम गोसावी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, अमोल मासुळे, कमलेश देवरे, पुष्पा बोरसे, विमल पाटील, मंगला पाटील, सहाय्यक आयुक्त विनायक कोते आदी उपस्थित होते.

कमलेश देवरे यांनी महापालिकेच्या कराराने दिलेल्या जागांचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेच्या 197 जागा कराराने दिल्या असून ज्या जागांचा करार संपला आहे.

अशा जागा धारकांना नोटीसा दिल्या आहेत का? दीड महिन्यानंतर महापालिकेने काय कारवाई केली असा मुद्दा देवरे यांनी उपस्थित केला.

यावर सभापती बैसाणे म्हणाले की, संबंधितांना तात्काळ नोटीस पाठवून तातडीने खुलासा मागविण्याची कारवाई करावी तसेच ज्यांची मुदत संपली आहे अशा जागा ताब्यात घ्याव्यात. काँग्रेस भवनाचा जागेचाही करार संपला आहे. ही वास्तु महत्वाची असल्याने कारवाईची सुरुवात काँग्रेस भवनापासून करावी. महापालिकेच्या अधिकार्यांना हे जमत नसेल तर पालिकेचा विश्वस्त म्हणून मी स्वत: काँग्रेस भवनाच्या कारवाईसाठी येईल असे त्यांनी सांगितले.

कुत्र्यांचा बंदोबस्त करा

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर पालिका उपाययोजना का करीत नाहीत. असा मुद्दा अमोल मासुळे यांनी उपस्थित केला. यावर सभापतींनी शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे तसेच मृत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 15 दिवसाच्या आत निविदा तयार करुन स्थायी समितीपुढे सादर करावी, तसेच आरोग्य अधिकार्यांनीही पशु वैद्यकीय अधिकार्यांचे रिक्त पद कंत्राटी तत्वावर भरण्याबाबत कारवाई करावी अशी सूचना सभापतींनी केली.