धुवा,पण एवढे धुवू नका

मनपा स्थायीत नगरसेवकांचा आरोप; बाजार फी संदर्भातला विषय तहकूब
धुवा,पण एवढे धुवू नका

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दैनंदिन बाजार फी वसुली विषयावरुन आज मनपा स्थायीत खडाजंगी झाली. धुवा, पण एवढे धुवू नका, असे बाजार फी वसुल प्रमुख सुडके यांना सभागृहाने सुनावले.

वसुली आमच्याकडे द्या तुमची आठवड्याची वसुली आम्ही एका दिवसात देतो, घेता का चॅलेंज? असा प्रश्न ही उपस्थित करण्यात आला. यामुळे प्रशासन निरुत्तर झाले व बाजार फीचा विषय तहकूब करण्यात आला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती सुनिल बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभागृहात दैनंदिन बाजार फी न भरणार्‍या पथविक्रेत्यांवर दंड आकारणी व कार्यपध्दती ठरविणेबाबत विषय चर्चेला आला.

यावरुन सभागृहात हा विषय चांगलाच गाजला. बाजार फी न भरणार्‍या पथविक्रेत्यांना पाचपट दंड आकारणी करावी असा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. त्यावर दररोज किती बाजार फी वसुल होते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

बाजार फी वसुलीसाठी ठेकेदार का नियुक्त केला जात नाही. यावर तीन वेळा निविदा काढण्यात आली. मात्र कोणीही निविदा भरली नाही. बाजार फी वसुलीचा ठेका 35 लाख देण्यासाठी निविदा होती.

आता बाजार फी वसुलीची रकम दहा रुपयावरुन 15 रुपये करण्यात आल्याने निविदा 58 लाख रुपयापर्यंत देण्याचे ठरविण्यात आले. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कर्मचारी रोज किती बाजार फी वसुल करतात असा प्रश्न नंदु सोनार यांनी उपस्थित केला. त्यावर दररोज नव्हेतर साप्ताहीक 30 हजार रुपये वसुली येते, असे सुडके यांनी सांगितले.

त्यावर धुवा पण एवढे धुवू नका असे श्री. सोनार यांनी सुनावले. तुम्ही 30 हजार वसुली देतात तर आम्ही एक लाख 30 हजार वसुली देवू असे आव्हान सोनार यांनी दिले. यावर सभापतींनी पडता पाडण्याचा प्रयत्न केला. अखेर बाजार फीचा विषय तहकूब करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com