महापालिकेतील रिक्त पदे तत्काळ भरा
राजकीय

महापालिकेतील रिक्त पदे तत्काळ भरा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेतील रिक्त पदे तत्काळ भरावीत व शहराला विकास कामांसाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी शहराचे आ. डॉ. फारूक शाह यांनी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांची मंत्रालय येथे भेट घेऊन त्यांना तसे निवेदनही दिले.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. मनपाचा आस्थापना खर्च जास्त असल्याने अनेक वर्षापासुन कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. यामुळे अनेक विभागात काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही.

परिणामी नागरिकांचे व प्रशासनाचे कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांचा वेळ वाया जातो. तसेच दरवर्षी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमुळे तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अतिरिक्त कामकाज करावे लागते. त्यामुळे महापालिकेतील रिक्त पदांची भरती तत्काळ करण्यात यावी.

या संबंधीचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्यामुळे कर्मचार्‍यांची भरती करण्यास अडचण येत आहे. तरी संबंधित प्रस्तावास तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सदर प्रस्तावाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. तसेच धुळे शहरातील विविध विकास कामांसाठी विशेष निधी अंतर्गत निधी मंजुर करून तो निधी लवकरच महापालिकेला वर्ग केला जाईल, असे आश्वासन नगरविकास मंत्र्यांनी आ. डॉ. फारूक शाह यांना दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com