हिलाल माळींचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार

मनपाच्या महासभेत महापौरांचा एल्लगार; नामकरणाच्या विषयावरुन वादंग
हिलाल माळींचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांचा महापालिकेच्या महासभेत निषेधाचा ठराव घ्यावा एवढी त्यांची पात्रता नाही. ते माझ्यासाठी दुर्लक्षीत घटक आहेत. केवळ प्रसिध्दीसाठी त्याचा खटाटोप असतो. पक्षाचा उपयोग ते वैयक्तीक भांडणासाठी करत आहेत. त्यांचे सर्व कारनामे आपल्याला माहिती आहे. ते सर्व लवकरच जनतेच्या समोर आणु, असा एल्गार महापौर चंद्रकांत सोनार यांनी महासभेत केला.

महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण महासभा आज सकाळी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात महापौर सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला उपमहापौर कल्याणीताई अंपळकर, आयुक्त अजीज शेख, अति.आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, सभागृह नेते राजेश पवार, हिरामण गवळी, हर्षकुमार रेलन, शितलकुमार नवले, राजू पाटील, युवराज पाटील, संतोष खताळ, योगीताताई बागुल, नागसेन बोरसे, अमोल मासुळे, संतोष गवळी, वसीम बारी, अमीन पटेल, सईद बेग, हिना पठाण, प्रतिभाताई चौधरी, वंदनाताई भामरे, सुरेखाताई उगले, सईदा अन्सारी, महरुन्निसा शेख, स्नेहल जाधव, वैशाली वराडे आदी सदस्य उपस्थित होते.

धुळ्यात ऑडीओ क्लीपवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काल हिलाल माळी यांनी पत्रपरिषद घेवून मनपातील सत्ताधार्‍यांचे वाभाडे काढले. महापौर चंद्रकांत सोनार व त्यांच्या नगरसवेक पुत्राने ऑडीओ क्लीप व्हायरल करुन आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचे जोरदार पडसाद आज महापालिकेच्या महासभेत उमटले.

सभेच्या सुरूवातीला नगरसेवक स्नेहल जाधव, विजय माळी यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यावर भाजपाचे नगरसेवक शितल नवले यांनी माळीं विरोधात तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. माळी हे सत्ताधारी भाजपावर विविध आरोप करत बदनाम करीत असल्याचे सांगत माळीं विरोधांतील निषेधाच्या ठरावाला माझा पाठींबा असल्याचे सांगितले.

त्यानंतर महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की, हिलाल माळी हे निषेध करण्याएवढी मोठी व्यक्ती नाही. कोणता तरी वाद करायचा आणि प्रसिध्दी मिळवायची असा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे त्यांना मी उत्तरे देत नाही. माझ्या लेखी ते बेदखल आहेत. मात्र, माझ्यासह माझ्या मुलावर त्यांनी शिंतोडे उडविले. ते चुकीचे आहे. आमच्या वैयक्तिक भांडणात हिलाल माळींनी स्वतःच्या पक्षाला वेठीस धरले आहे. आम्ही कधीही सामान्य नागरिकांना किंवा व्यापार्‍यांना त्रास दिलेला नाही. परंतु, हिलाल माळींचे सर्व कारनामे आपल्याला माहिती आहेत. त्यांनी मंजुळाताई गावित यांच्यासह कोणा-कोणाकडून किती पैसे घेतले, व्यापार्‍यांकडून खंडणी गोळा करणे, दोन नंबरवाल्यांकडून हप्ते गोळा करणे, ते पैसे कुठे जातात? याची जंत्रीच आपल्याकडे आहे. त्यामुळे येत्या काळात हिलाल माळींची सर्व माहिती उघड करुन धुळेकरांसमोर उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा खरा चेहरा लवकरच जनतेसमोर आणला जाईल, असे संकेतही महौपार चंद्रकांत सोनार यांनी यावेळी दिले. त्यानंतर निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.

त्यानंतर इतिवृत्ताच्या वाचनाच्या विषयावर शितल नवले म्हणाले की, 31 डिसेंबर 2019 च्या इतिवृत्तानुसार मिल परिसरातील अमरधामसाठी 1 कोटीची मागणी करण्यात आली होती. मात्र निधीची तरतुद करण्यात आली नाही. त्यावर महापौरांनी सुधारीत बजेटमध्ये ही तरतुद केली जाईल, असे सांगितले. नगरसेवक हर्षरेलन यांनी इतिवृत्त दिल्याबद्दल नगरसचिवांचे आभार मानले.त्याचवेळी त्यांनी विषय समिती आणि प्रभाग समितीचा मुद्दा मांडला. या समित्या अद्यापर्यंत गठीत का करण्यात आल्या नाहीत. असा प्रश्न त्यांनी मांडला. त्यावर नगरसचिवांनी प्रभाग समित्यांसाठी क्षेत्र निश्चित करुन पुढील महिन्यात कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

नामकरणाच्या विषयावरुन घोषणाबाजी- महासभेत विषयपत्रिकेवरील 29 विषयांपैकी तब्बल 17 विषय नामकरणाचे होते. त्यामुळे नामकरणाच्या मुद्यावरुन सभेच चांगलाच वाद रंगला. उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांनी चाळीसगाव रोड शंभरफुटी रोड येथील चौकास स्वराज्य रक्षक संभाजी राजे चौक असे नामकरण करण्याची मागणी केली होती. मात्र, नामकरणास आपला विरोध नसून अशा नामकरणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होणार असल्याचा मुद्दा नगरसेवक अमिन पटेल यांनी मांडला. यातून सभागृहात सदस्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणाही देण्यात आल्या. महापौरांनी हा विषय मंजुर केला. त्यानंतरही गोंधळ सुरुच होता.

यावेळी नगरसेवक हिरामण गवळी यांनी नामकरणाबाबत शासनाचे काही निर्देश आहेत का? हे तपासून त्याआधारे नामकरण करण्याची मागणी केली. तर नगरसेवक साबीरशेठ यांनीही हिरामण गवळींना अनुमोदन देत नामकरणाच्या सर्व विषयांना आपली हरकत असल्याचे सांगीतले. ज्यांनी शहरासाठी, समाजासाठी, देशासाठी बलिदान दिले आहे, अशा लोकांचे नावे देण्याऐवजी कोणीही उठसूठ कोणाचेही नाव रस्ते व चौकांना देण्याची मागणी करत आहे. त्यामुळे शासन निर्णयाचा अभ्यास व्हावा, असे त्यांनी सांगीतले. तर संतोष गवळी यांनी, कोणाचेही नाव देण्याची मागणी करणार्‍या नगरसेवकाचे चार महिन्याचे वेतन कापण्यात यावे व तो निधी पाणी, अग्निशामक बंब आदींच्या सुधारणेसाठी वापरावा, अशी सूचना मांडली. प्रतिभाताई चौधरी यांनी आपल्या भागातील उद्यानाच्या नामकरणाचा विषय पटलावर का घेतला नाही? अशी विचारणा केली. तसेच नामकरण करताना राष्ट्रसंत, थोर महापुरुष, संत आदींचीच नावे देण्याबाबत महासभेत ठराव करण्यात यावा, अशी मागणी केली.

हद्दवाढीतील नगरसेवकांची नाराजी

महापालिकेची हद्दवाढ करुन गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे समाविष्ट करताना गावातून गोळा होणार्‍या वसूलीपैकी 80 टक्के रक्कम गावाच्या विकासकामांसाठी खर्च करण्याचा 80-20 फॉर्म्यूला ठरविण्यात आला होता. परंतु, गावांच्या विकासाठी निधीच दिला जात नसल्याचा आरोप हद्दवाढीतील नगरसेवकांनी केला. शिवाय कामांच्या मंजूरीसाठी दिलेली फाईलही गायब होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र, नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी आपल्या भागात कामे मंजुर झाल्याचे सांगत महापौरांचे अभिनंदन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com