Friday, April 26, 2024
Homeराजकीयमनपाच्या स्थायी सभेत नागरी समस्यांबाबत संताप

मनपाच्या स्थायी सभेत नागरी समस्यांबाबत संताप

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महापालिकेची स्थायी समितीची सभा आज नागरी समस्यांवर चांगलीच गाजली. शहरातील रस्त्यावरील खड्डे, धोकेदायक रस्ते, नालेसफाई, स्वच्छता, बंद पथदीवे, भटकीकुत्री या प्रश्नांवर सदस्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

- Advertisement -

भुमिगत गटारीमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यावर कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत, असा संतप्त सवाल करत या ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सभेत करण्यात आली.महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ तसेच सदस्य शितलकुमार नवले, अमोल मासुळे, सुनिल बैसाणे, कमलेश देवरे, अमिन पटेल, भारती माळी, नागसेन बोरसे आदींसह उपायुक्त शांताराम गोसावी, शिल्पा नाईक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत अजेंड्यावरील एकूण 11 विषयांवर चर्चा झाली. सुरुवातीला आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा झाली.

शितलकुमार नवले यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न मांडला. त्यात अमिन पटेल, सुनिल बैसाणे, अमोल मासुळे यांनीही या प्रश्नाला साथ देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

महापालिकेच्या इमारतीत पदाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. तसेच हिरे रूग्णालयातही कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर सभापती जाधव यांनी डॉग व्हॅनसाठी महासभेत तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले.

तसेच पशुवैद्यकीय अधिकारी भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्याची सूचना प्रशासनाला केली. यावेळी अमोल मासुळे व शितलकुमार नवले यांनी मिल परिसरातील बंद पथदिव्यांचा मुद्दा उपस्थित करत तो तातडीने सोडविण्याची सूचना मांडली.

तर कमलेश देवरे यांनी नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. नालेसफाई केवळ कागदावर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अमिन पटेल यांनीही स्लम भागात 500 ते 700 घरांमध्ये पाणी शिरल्याचे सांगत यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

सुनिल बैसाणे यांनी सांगितले की, देवपूर भागात भूमीगत गटारीच्या निष्कृष्ट कामामुळे रस्ते धोकेदायक झाले आहेत. तीन-चार दिवसापुर्वीच एक ज्येष्ठ नागरिक 15 फुट खोल खड्डयात पडून जखमी झाला. त्यास 22 टाके पडले. त्यामुळे कोणाचा मृत्यू होण्याची वाट न बघता ठेकेदावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

त्यावर सभापतींनी याबाबत प्रशासनाला गांभीर्याने कार्यवाही करण्याचे आदेशीत केले. तसेच सुनिल बैसाणे यांनी पंडीत दिनदयाल योजनेत भ्रष्टाचार करणार्‍यांवर अद्याप कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी पुढील बैठकीपर्यंत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तर भारती माळी यांनी आपल्या प्रभागातील कच्च्या रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे तात्पूरता मुरूम टाकण्याची सूचना केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या