Friday, April 26, 2024
Homeराजकीयकृषी सभापतींसह जि.प.सदस्यांचे निदर्शन

कृषी सभापतींसह जि.प.सदस्यांचे निदर्शन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात मका व कापूस हमी भाव केंद्र (फेडरेशन) त्वरीत सुरु करा या मागणीसाठी जि.प.चे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनात जि.प. सदस्य, शेतकरी, भाजपाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिले. शासनाने उत्पादन खरेदीबाबत अध्यादेश काढला परंतू अद्याप पोर्टलवर नोंदणी सुरु झालेली नाही.

याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, यंदा खरीप हंगामात पावसाळा वेळेवर सुरु झाल्याने पेरणी करण्यात आली.

पिकेही चांगली आली परंतू आधीच करोना काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तर सप्टेबर महिन्यात परतीच्या पावसामुळे बाजरी, ज्वारी, मका, कापूस, भाजीपाला ही पिके हातातून गेली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. खरीप हंगाम वाया गेला.

जिल्ह्यात मका व कापूस लागवड जास्त प्रमाणात केली जाते. त्यामुळे मका व कापूस काढून घरात पडला आहे. साठवणूकीचे साधन नसल्यामुळे तो खराब होण्याची शक्यता आहे. तसेच खासगी व्यापारी कमी भावात खरेदी करुन शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे.

शासनाने उत्पादन खरेदी करण्याबाबत अध्यादेश काढलेला आहे. परंतू अद्याप पोर्टलवर नोंदणी सुरु करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. तरी त्वरीत नाव नोंदणी करुन मका व कापूस खरेदी केंद्र सुरु करावे. असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर रामकृष्ण खलाणे, जि.प. सदस्य आशुतोष पाटील, सौ. मनिषा खलाणे, जि.प. सदस्या सौ. शोभाबाई पाटील, भगवान देवरे, जि.प. सदस्य विरेंद्रसिंग गिरासे, किसान मोर्चाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, शेतकरी विजय चौधरी, अमित जैन, धर्मा माळी, विजय माळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, शाम बडगुजर, प्रमोद सोनवणे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या