धुळे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, ही पदे पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरणार

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई / प्रतिनिधी

धुळे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन लवकर केले जाईल. त्यातील ‘ड’ संवर्गातील पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरले जातील, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नात्तराच्या तासात सांगितले.

यासंदर्भात फारुक शाह यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, धुळे जिल्हा रुग्णालय १०० खाटांचे असून तेथे १०० खाटांचे महिला रुग्णालय आहे. जिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करण्यासाठी श्रेणी वर्धनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून आयुक्तालयामार्फत जोड बृहत आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

या दोन्ही रुग्णालयासाठी १३७ पदे मंजुर असून त्यातील ८९ पदे भरण्यात आली असून ४८ पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या परिक्षेनंतर ही रिक्त पदे भरली जातील, असेही त्यांनी सांगितले.

बचत गटांमार्फतअंगणवाडी केंद्रात आहार देणार : ॲड.यशोमती ठाकुर

राज्यात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे अंगणवाडीतील बालके आणि गर्भवतींना पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट महाराष्ट्र को.ऑपरेटिव्ह स्टेट फाऊंडेशन संस्थेला दिले असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थानिक महिला मंडळ आणि बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु करण्यात येईल, असे महिला आणि बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकुर यांनी सांगितले.

चौथा हप्ता दोन महिन्यात देणार : मुश्रीफ
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत निधीचा चौथा हप्ता दोन महिन्यात देण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत बंधित आणि अबंधित अशा दोन स्वरुपात निधी प्राप्त झाला आहे. सन २०२०-२१ या पहिल्या आर्थिक वर्षात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे त्यांचे नियोजन समन्वय,नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

बंधित स्वरुपात प्राप्त एकूण निधीच्या प्रत्येकी ५० टक्के निधीचा वापर स्वच्छता आणि पिण्याचे पाणी या बाबींसाठी करायचा आहे. हा निधी लोकसंख्येप्रमाणे देण्यात येणार असून गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या छोट्या छोट्या कामांसाठी वापरता येणार आहे. हा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत योजनेबाबत सकारात्मक : अमित देशमुख

राज्यातील कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत बांधण्याच्या योजनेबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *