Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशंभरी ओलांडलेल्या देवळाली सोसायटीत ‘खुर्ची’वरून मानापमान नाट्य

शंभरी ओलांडलेल्या देवळाली सोसायटीत ‘खुर्ची’वरून मानापमान नाट्य

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात अग्रणी असलेल्या देवळाली प्रवरा सहकारी सोसायटीमध्ये अध्यक्षपदावरून चांगलेच मानापमान नाट्य रंगले आहे.

- Advertisement -

शेवटी नाराज उपाध्यक्षाला अध्यक्ष करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त केल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत हे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. आता नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

देवळाली प्रवरा सोसायटीमध्ये मागील पंचवार्षिकला बारापैकी अकरा जागा जिंकून भाजपाने स्पष्ट बहुमत पटकावले होते. सत्ता ताब्यात आल्यानंतर दरवर्षी एका संचालकाला अध्यक्ष व एकाला उपाध्यक्ष करण्याचे ठरले. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी सर्वांना संधी दिली. संस्थेची यावर्षी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असल्याने शेवटच्या जोडीला अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी होती.

त्याप्रमाणे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची नोव्हेंबर महिन्यात निवड करण्यात आली. परंतु यावेळी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी असलेल्या उमेदवाराला डावलून उपाध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे त्या संचालकासह त्यांच्या समर्थक संचालकांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. तो संचालक नाराज झाल्याने त्याचा कडूघास काढण्यासाठी भाजपाच्या एका पदाधिकार्‍याने त्यांच्या घरी जाऊन समजूत काढली.

परंतु त्यानंतर सत्ताधारी गटातील सहा संचालकांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी केली. संचालकांनी बंडाचे निशाण फडकविल्याची कुणकुण पक्षश्रेष्ठींना लागताच त्यांनी संचालक मंडळाची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत त्या संचालकाला अध्यक्ष करण्यासाठी सर्व संचालकांनी सहमती दर्शवली.

विशेषतः त्या सहा संचालकांनी आग्रह धरला. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सुपूर्त केले. यानंतर चार,-पाच दिवसापूर्वी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये हे राजीनामे मंजूर करण्यात आले. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संस्थेची निवडणूक याचवर्षी होत असल्याने सात-आठ महिन्यांचा कारभार करण्याची संधी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना मिळणार आहे.

सन 1917 साली स्थापन झालेल्या या संस्थेचा हिरकमहोत्सव साजरा करण्याची संधी देखील या संचालक मंडळाला मिळाली. त्यावेळी अध्यक्षपदाची धुरा शहाजी कदम यांच्याकडे होती. विश्वनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे शासनाने संस्थेच्या एक कोटी सतरा लाखांचा जमा खर्च व ताळेबंद केल्यास आज ही संस्था सभासदांना लाभांश देऊ शकते. नवीन अध्यक्षपदी ढूस तर उपाध्यपदी टिक्कल यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या