
मुंबई | Mumbai
एकीकडे भाजपने (BJP) पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच (Eknath Shinde) नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एकनाथ शिंदेच युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नुकत्याच केलेल्या विधानामुळे अद्याप युतीत स्पष्ट भूमिका ठरली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे...
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शिवसेना-भाजप युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ सालची विधानसभा निवडणूक (Assembly Elections) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. सहाजिकच आहे जो मुख्यमंत्री असतो त्याच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते. मात्र, निवडणुका नेतृत्वात लढवल्या जाणे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणे किंवा मुख्यमंत्री निवडला जाणे या वेगवेगळ्या गोष्टी असतात.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्याचा निर्णय वरिष्ठ घेतात.पक्षाध्यक्ष जे. पी.नड्डा यांनाच याबाबत विचारायला हवे. पक्षनेतृत्वाला त्या वेळी वाटले की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलायचा आहे. तर ते त्यावेळी तसा निर्णय घेऊ शकतात. मात्र मला वाटत नाही तसा काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ते पुढे म्हणाले की, पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मी खूप काम केले आहे. मी ज्या जागी आहे, तिथे खूश आहे. माझ्यासाठी तर पक्षाला पुन्हा निवडून आणणे याला प्राधान्य आहे. नेता कोण कधी बनेल यावर पक्ष निर्णय घेईल. मला मोदींनी मुख्यमंत्री केले, तेव्हा पक्षात इतरही अनेक लोक होते. पण मोदींना वाटले की मी चांगले काम करू शकेन म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे शिंदे गट आणि भाजप (Shinde group and BJP) यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सर्वच काही अलबेल नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस यांच्या विधानामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे.