VIDEO : महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा
मुंबई । Mumbai
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच पेटलंय. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. या वक्तव्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्याचं राज्यातील अनेक नेत्यांकडून निषेध करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांनी वारंवार असे वादग्रस्त वक्तव्य करु नयेत, अशा प्रतिक्रियाही समोर येत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, 'संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा मी निषेध करतो. ते देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वांतत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून पाहिलं जात. अशा महानायकाबाबत बोलताना पुर्णपणे अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी किंवा अन्य कोणीही करू नये. कारण करोडो करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे संताप तयार होतो. लोक महात्मा गांधी यांच्याबद्दल असं बोलणं कधीही सहन करून घेणार नाहीत. तर यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती राज्य सरकारकडून केली जाईल. महात्मा गांधी असतील किंवा वीर सावरकर असो, कोणाबाबतही अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत', असंही फडणवीस म्हणाले आहेत.
काय आहे वाद?
संभाजी भिडे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अमरावतीमध्ये बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम या सभागृहातील कार्यक्रमातील ही क्लिप असल्याचे बोलले जाते. या कार्यक्रमातील संभाजी भिडे महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह दावे केल्याचे ऐकायला मिळत आहे. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला,असे या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. तसेच त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचेही क्लिपमध्ये पुढे म्हटले आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होत आहे. विधानसभेतदेखील या मुद्द्यावरुन खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात संभाजी भिडे यांच्यावर आगपाखड करत त्यांच्या अटकेची मागणी केली.