
मुंबई (Mumbai)
केंद्र सरकारने जीएसटीचा (GST) पैसा अडविल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सातत्याने होत असताना मंगळवारी केंद्राने मोठा दिलासा दिला. केंद्राने विविध राज्यांना एकाचवेळी तब्बल ८६ हजार ९१२ कोटी जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) भरपाईपोटी दिले. महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये मिळाले.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत महाराष्ट्रात तत्काळ पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा असे म्हटले आहे.
"३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज १ जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार? राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची 'ढकलगाडी' करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार?," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा! असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले