अमरावती हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

अमरावती हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई | Mumbai

त्रिपुरा हिंसाचाराची (Tripura Violence) आग महाराष्ट्रातही पसरली आहे. त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये (Amravat) दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. शुक्रवारी अमरावतीमध्ये त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली, त्यादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी शनिवारी बंद पुकारला आहे. शहरात गर्दी वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. शहरातील परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच घडली नसल्याचं सांगितलं आहे. त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे'.

'सोशल मीडियावर चुकीचे फोटो व्हायरल करून हा सगळा प्रकार घडवण्यात आल्याचं हे षडयंत्र असल्याचा दावा यावेळी फडणवीसांनी केला. “त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलनं होत आहेत, त्या मशिदीचे फोटो जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले हे देखील प्रकाशित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई देखील केली आहे', असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला. प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की, अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदी कालावधीत कोणताही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. या आदेशाचा भंग करणारा कोणताही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com