फडणवीसांनीही टोचले सत्तारांचे कान; म्हणाले,...

फडणवीसांनीही टोचले सत्तारांचे कान; म्हणाले,...

मुंबई | Mumbai

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे कान टोचले आहे. तसंच, राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, 'कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत. ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. पण जसं आमच्याकडच्यांना ते लागू आहे, तसंच ते त्यांच्याकडच्यांनाही लागू आहे. पण मला आज त्याच्यात जायचं नाहीये.' तसेच, 'मला वाटतं की राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कोणतंही समर्थ मी करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके आणि काय काय उलटसुलट बोलणं हेही चुकीचं आहे. हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. पातळी खाली चालली आहे. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये', असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे, यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी शिष्टमंडळात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com