मुख्यमंत्र्यांनंतर देवेंद्र फडणवीसही राज्यपालांच्या भेटीला, कारण काय?

मुख्यमंत्र्यांनंतर देवेंद्र फडणवीसही राज्यपालांच्या भेटीला, कारण काय?

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आरक्षणाचे पडसाद आता राज्यातील अनेक जिल्ह्यांत दिसून येत आहेत. अनेक ठिकाणहून जाळपोळीच्या घटना समोर येत असतानाच, राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. काल, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती.

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही राज्यपाल बैस यांच्या भेटीला गेले आहेत. विशेष अधिवेशनाची मागणी केली जात आहे, त्याच पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. आज, मंत्रीमंडळ बैठक होणार आहे परंतु या बैठकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल बैस यांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मराठा समाज आक्रमक झाल्याने सध्या राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज (ता. 31 ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. पण त्यांची प्रकृती खालावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे कोणतीही अघटित घटना घडू नये, यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणि आता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये विशेष अधिवेशनाबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीआधी घेतलेल्या या भेटीची चर्चा रंगली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com